नवी मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येत घट; मात्र चिंता वाढत्या कोरोनामृत्यूंची

 


नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा दैनंदिन आलेख कमी होत असल्याचे दिसून येत असल्याने ही शहरासाठी दिलासादायक बाब आहे. मात्र असे असले तरी कोरोनामुळे रोज तीन ते चार जणांचे होणारे मृत्यू ही पालिकेसाठी चिंतेची बाब आहे. 23 जानेवारी ते 6 फेबु्रवारी या 15 दिवसांत कोरोनामुळे नवी मुंबईत 45 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे पालिकेच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.

लसीकरणाद्वारे करोनावर मात करण्यासाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. परिणामी, दररोज सापडणार्‍या कोरोनारुग्णांची संख्या सध्या कमी होताना दिसत आहे. एकीकडे हे दिलासादायक चित्र असतांना दुसरीकडे मात्र कोरोनामुळे बळी जाणार्‍यांचे प्रमाण वाढतांना दिसत आहे. दररोजची मृत्यूसंख्या तीन ते चारवर जात असल्यामुळे शहरातील नागरिकांसह महापालिकेची चिंता वाढली आहे.

पहिल्या व दुसर्‍या लाटेत नवी मुंबईत रुग्णसंख्येसह मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर होते. 

आता ते वाढताना दिसत आहेत. दररोज तीन ते चार करोनाबाधितांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे पालिकेचीही चिंता वाढली आहे. त्यामुळे कोरोनाचा आलेख जरी मंदावत असला तरी अजून कोरोना पूर्णपणे हद्दपार झालेला नसल्याने लोकांनी काळजी घ्यावी आणि सुरक्षा नियमांचे पालन करावे, असे आवाहन वारंवार महापालिका यंत्रणांकडून केले जात आहे. दरम्यान, सध्यस्थितीत मृत पावणार्‍यांमध्ये सहव्याधी असणार्‍या व लसीकरण पूर्ण न झालेल्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे लसीकरणात कुणीही बघू घेवू अशी भूमिका कुणीही अवलंबू नये असे आवाहन वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केले जात आहे.

दरम्यान, दि.23 जानेवारी ते 6 फेबु्रवारी या दोन आठवड्यातील नवी मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या व मृत्यू संख्या पुढीलप्रमाणे - दि.23 जानेवारी बाधितांची संख्या - 1010, मृत्यू- 02, दि.24 जानेवारी कोरोनाबाधित -690, मृत्यू 03, दि.25 जानेवारी कोरोनाबाधित-  672, मृत्यू -5, 26 जानेवारी कोरोनाबाधित-653, मृत्यू - 04, दि.27 जानेवारी कोरोनाबाधित- 546, मृत्यू -01,दि.28 जानेवारी कोरोनाबाधित- 528, मृत्यू-3, दि.29 जानेवारी कोरोनाबाधित -503 तर मृत्यू -4, दि.30 जानेवारी कोरोनाबाधित- 342, मृत्यू 04, दि.1 फेबु्रवारी कोरोनाबाधितांची  संख्या-234, मृत्यू 04, दि.2 फेबु्रवारी कोरोनाबाधितांची संख्या- 265, मृत्यू- 02, दि.3 फेबु्रवारी कोरोनाबाधितांची संख्या-177, मृत्यू -3, दि.4 फेबु्रवारी कोरोनाबाधितांची संख्या 125, मृत्यू निरंक, दि.5 फेबु्रवारी कोरोनाबाधितांची संख्या - 103 , मृत्यू-04 तर दि.6 फेब्रुवारी रोजी  कोरोनाबाधितांची संख्या - 86 , मृत्यू-04 असे आहे. तर उपरोक्त दोन आठवडयातील एकूण सक्रिय उपचाराधीन रुग्णांची संख्या 69428 इतकी झाली आहे.