इच्छूकांची दोन ठिकाणांहून नशीब आजमावण्याची तयारी... एका वॉर्डातून ‘पत्नी’ तर दुसर्‍या वॉर्डातून ‘दादला’ निवडणूक लढविणार!

 


नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुंबई महापालिका निवडणूकीसाठी प्रभाग रचना काही दिवसांपूर्वीच जाहीर झाली आहे. मात्र या प्रभाग रचनेवरुन कही खुशी कही गम असे वातावरण निर्माण होण्यासह या प्रभाग रचनेवरून भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांनी न्यायालयात धाव घेतली असल्याने आतापासूनच नवी मुंबईचे राजकीय वातावरण चांगलेच तापु लागले आहे. दरम्यान, प्रभागरचना जाहीर झाली असली, तरी अजून आरक्षण जाहीर होण्याचा एक टप्पा बाकी आहे. मात्र अशी एकंदीत परिस्थिती असली तरी आगामी महापालिका निवडणूकीच्या निमित्ताने नवी मुंबईतील अनेक दाम्पत्य निवडणूक लढविण्याच्या दिशेने प्रयत्न करतांना दिसत असल्याचे दिसून येत आहे. यात प्रामुख्याने एका वॉर्डमधून पती तर दुसर्‍या वॉर्डमधून पत्नीला निवडणूकीच्या रिंगणात उतरवून किमान दोन पैकी एक  नगरसेवक पद तरी गळ्यात पडेल अशी मनिषा अनेकांची आहे.

याबाबत बोलतांना काही इच्छुकांनी सांगितले की, महापालिका निवडणूकीचा कार्यक्रम जरी जाहीर झाला नसला तरी एप्रिल महिन्यात ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. मात्र आरक्षणाबाबत स्पष्टता बाकी असल्याने आम्ही अजूनही संभ्रमातच आहे. हा प्रभाग तर आपला बालेकिल्लाच आहे. समाजात उतरून काम केले आहे. शिवाय निवडणूकीच्या निमित्ताने सगळी फिल्डिंग लावून बसलोय. कौल आपल्या बाजूने लागला तर विजय हा निश्चितच ठरलेला आहे. पण तरी सुद्धा कौल फिरला तर दोन्ही बाजूने लढण्याची आपण तयारी करणार आहोत. यासाठी इकडे पत्नीला तर शेजारच्या वॉर्डात आपण स्वत: उभे राहून ही निवडणूक लढवू असा मनोदय अनेक इच्छुक बोलून दाखवितांना दिसत आहेत. त्यासाठी निवडणुकांची तयारीही आतापासूच जोरात सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अनेकांकडून सध्या आधार कार्ड, पॅन कार्ड, युनिव्हर्सल कार्ड, इ-श्रमिक कार्ड वाटप करणे असे उपक्रम हाती घेण्यावर भर दिला जात आहे. विशेष म्हणजे हा उपक्रम राबवितांना अगदी शेजारच्या प्रभागातील नागरिकांनाही कार्ड दिली जात आहे. या कामासाठी  दररोज मी एकेकाला नऊशे हजेरी देतोय. व यासाठी दररोजचा खर्च सात-आठ हजार खर्च होते असल्याचे याविषयी बोलतांना एका इच्छुकाने सांगितले. या उपक्रमांमुळे नागरिकही खुश होतात. अगदी येऊन भेटून ते याबाबत अभिप्रायही देतात, झालं ंबर का साहेब माझं काम. तेव्हा काका, मावशी, दादा, भाऊ तुम्ही फक्त आमच्यावर लक्ष ठेवा असेही या इच्छुकांकडून सांगितले जाते. 

दरम्यान, इच्छुकांकडून कामाची व लढण्याची सुरू असलेली ही पद्धत आता बहुतेक वॉर्डात दिसून येत आहे. यात प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 1 ते 41 पर्यंत निवडणूक लढवण्यासाठी काही इच्छुक दाम्पत्यांबद्दल माहिती मिळाली आहे. दिघा विभागातून गवते व आंग्रे दाम्पत्य, ऐरोली विभागातून मढवी व सोनावणे, घणसोली विभागातून म्हात्रे, संकपाळ व दोन्ही पाटील, कोपरखैरणे विभागातून राऊत, पाटील, म्हात्रे, आचरे, भोईर, नाईक व कचरे, वाशी विभागातून, भोईर, मोरे, वाळुंज, शेवाळे, गायकवाड व भगत, तुर्भे विभागातून घरत, पाटील, कुलकर्णी, वास्के व मेढकर, सानपाडा विभागातून वास्कर, सूर्यराव, पावगे, बोर्‍हाडे, कुरकुटे व भगत, जुईनगर परिसरातून मढवी, औटी व ससाणे, नेरुळ विभागातून मांडवे, दोन्ही पाटील, मेहेर, ठाकूर, तिकोने, म्हात्रे, भोपी, इथापे, शेट्टी व भगत, बेलापूर विभागातून म्हात्रे, घंगाळे, पाटील, सुतार, नाथ व नरबागे असे विविध दाम्पत्य निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे सांगण्यात येत असून त्यादृष्टीने त्यांनी तयारीही केली असल्याचे समजते.