पनवेल (वार्ताहर) - नवी मुंबईतील पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीत मिळून आलेल्या एका बांग्लादेशी महिलेला तिच्या बांग्लादेशातील मुळगावी पाठविण्यासाठी करावयाची कायदेशीर प्रक्रिया हाती घेतली असून शासनाच्या मदतीने आता तिला तिच्या मुळगावी सोडण्यात येणार आहे.
पनवेल तालुका पोलीस ठाण्यातील गस्तीवरील पोलिस अधिकार्यांना,काही दिवसांपूर्वी एक महिला जखमी व बेवारस स्थितीत रस्त्यावर मिळुन आली होती. यानंतर पोलिसांनी तिला सिल आश्रम, वांगणी, नेरे, ता.पनवेल येथे सुरक्षिततेकामी ठेवले होते. सदर महिलेस तिचे पुर्ण नाव व गाव सांगता येत नव्हते व तिला त्वचारोग व मानसिक आजार असल्याने सिल आश्रम, पनवेल यांनी तिच्यावर योग्य ते वैद्यकीय उपचार व मानसोपचार तज्ज्ञांकडून तिचे समुपदेशन केले असता ती पुर्णपणे शुद्धीवर आली. सदर महिलेकडे त्यांनी चौकशी केली असता, ती मुळची बांगलादेशी नागरीक असून तिचे पुर्ण नाव हसिना (हसन बाबु)असल्याचे सांगितले. यानंतर सदर बांगलादेशी नागरिक महिलेविरुद्ध पनवेल तालुका पोलीस ठाण्यात पारपत्र अधिनियम,1950 कलम 3(अ),6(अ) सह परकीय नागरिक आदेश,1948 नियम-3 सह परकीय नागरिकांचा कायदा,1946 चे कलम 14(सी) अन्वये गुन्हा दाखल केल्यानंतर सदर महिलेस ताब्यात घेवून तिला जेएमएफसी,पनवेल यांच्यापुढे दोषारोप पत्रासह हजर केले असता मा. न्यायालयाने सदर महिलेस दोषसिद्ध ठरवून तिला 1000/- रू. दंड व दंड न भरल्यास 07 दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावलेली आहे. सदर महीलेने दंडाची पूर्ण रक्कम भरलेली आहे. दरम्यान, सदर महिलेस डिपोर्ट करण्याची तजवीज ठेवलेली होती. तसेच सदर बांगलादेशी महिलेस तिचे मुळ गावी डिपोर्ट करेपर्यंत तिला सिल आश्रम,पनवेल येथे ठेवलेले आहे. दरम्यान, सदर महिलेला सील आश्रम येथील फादर फिनिक्स व कॉडीनेटर जैन्नम्मा यांनी मेहनत घेवून तिच्या त्वचा रोगावर उपचार केले तसेच तिला बोलती केली. त्यामुळे त्यांच्या प्रयत्नामुळेच ती बांगलादेशामध्ये तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधू शकली. त्यानंतर सदर महिलेला बांगलादेश येथे तिच्या स्वगृही कसे पाठविता येईल यासाठी वपोनि रविंद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तेथील अधिकारी वर्गाशी संपर्क साधून ती मुळ गावी राहत असलेल्या तिच्या कुटुंबियांची माहिती घेतली व त्या आधारे शासनाच्या मदतीने आता तिला तिच्या मुळगावी सोडण्यात येणार आहे. यामुळे ती आनंदी असली तरी भारतीयांनी दिलेले प्रेम पुढील आयुष्यात कधीच विसरु शकणार नाही अशा भावना तिने यावेळी व्यक्त केल्या आहेत.