नवी मुंबई (प्रतिनिधी) - मुंंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक कांदा-बटाटा मार्केटमधील माथाडी कामगारांनी काल संप पुकारत व्यापार्यांनी पाठविलेल्या कांदा बटाटा मालाची चढ उतार करण्यास नकार दिला. तर माथाडी कामगारांची भूमिका आडमुठेपणाची असल्याचा आरोप करीत सोमवारपासून कांदा-बटाटा मार्केटमधील व्यापार्यांनी व्यापार बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे.
एपीएमसी मधील माथाडी वर्ग वारंवार आंदोलन करत असल्याने व्यापार्यांनी ही भूमिका घेतली आहे. काल माथाडी कामगारांनी कांदा बटाट्याच्या तब्बल 35 गाड्या अडवल्या. 50 किलो पेक्षा अधिक वजनाची गोण गाड्यांमध्ये असल्याने माथाडी कामगारांनी या गाड्या अडवून मालाची चढ उतार करण्यास नकार दिला. दरम्यान, माथाडी कामगार वारंवार आंदोलन करत असल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत. माथाडी कामगारांनी मालाची चढ उतार करण्यास नकार दिल्यामुळे शेतकर्यांचे देखील प्रचंड नुकसान होत असल्याने माथाडी कामगारांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी अशी मागणी व्यापार्यांनी केली. कालच्या माथाडी कामगारांनी केलेल्या आंदोलनांमुळे कांदा बटाटा शेतकरी सुद्धा त्रस्त असल्याचे दिसुन आले व त्यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली.
याविषयी बोलतांना व्यापारी राजेंद्र मणियार यांनी सांगितले की, संपूर्ण महाराष्ट्रात जे कामगार काम करतात. त्यांची एकमेव माथाडी युनियन आहे. हे कामगार सोलापूर व नगरमध्ये काम करतात व या वजनाच्या मालाच्या पिशव्या हाताळतात. मात्र मुुंबई मार्केटमध्ये कामगारांनी 50 किलो 53 किलोवरील पिशव्या हाताळण्यास मनाई केली आहे. या गोष्टीला बदल होण्यास वेळ लागेल याचे कारण म्हणजे शेतकर्यांच्या मालाची शेतावर पॅकिंग केली जाते. तेथे वजन काटे नसतात, एका पिशवीत ठासून ठासून माल भरला जातो व तो कधी कदाचित 48, कधी 50 तर कधी 52 किलो होवू शकतो. सध्या नवीन माल व त्यात पाणी जास्त असल्याने माल वजनदार असतो. त्यामुळे 45 किलोच्या पिशवीत माल ठासून भरल्यास त्याचे वजन 50 किलोच्या पुढे जाते. एकंदरीत ही परिस्थिती पाहता, माथाडी कामगारांनी सहकार्याची भावना घेणे गरजेचे असून कामगारांनी आंदोलन न करता कामकाज सुरु ठेवावे अशी विनंती केली. दरम्यान, माथाडी कामगारांनी अवलंबलेला हा मार्ग चुकीचा असून नेहमीच गाडया उभ्या राहत असल्यामुळे माल खराब झाल्यास त्याची जबाबदारी व्यापार्यांवर येते. त्यामुळे कामगारांकडून होणार्या या वारंवारच्या आंदोलनामुळे व्यापार्यांनीही सोमवारपासून कामकाज बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, माथाडी कामगारांनी काल मालाची चढ उतार करण्यास नकार दिल्याबद्दल बाजारात माल घेवून आलेल्या शेतकर्यांना मोठा त्रास सहन करावा लागला व याबाबत त्यांनीही नाराजी व्यक्त केली. शेतकर्यांना कुणी वाली नाही. बाजार समितीत आल्यावर मालाची हेलसांड सुरु आहे. माथाडी कामगारांनी वजनावरून केलेले कामबंद आंदोलन हे शेतकर्यांच्या विरोधात असल्याचे याविषयी बोलतांना बाजार समिती कांदा बटाटा मार्केटमध्ये माल घेवून आलेले अहमदनगरमधील शेतकरी जालिंदर जयसिंह इथापे यांनी सांगितले. तर याला पूर्ण जबाबदार कोण याचा शोध घेणे गरजेचे आहे. माथाडी कामगारांनी शेतकर्यांची पिळवणूक करू नये आमचे नूकसान होण्यापासून वाचवावे अशी विनंती यावेळी असंख्य शेतकर्यांनी केली.