नवी मुंबई (प्रतिनिधी) - महापेतील एल.अंँड.टी कंपनीत औषध फवारणीचे काम करत असतांना तेथील लोखंडी अँगल डोक्यात पडून, नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागात कंत्राटी पध्दतीवर कार्यरत असलेल्या विनोद विष्णू भोईटे नावाच्या औषध फवारणी कामगाराचा दुर्देवीरित्या अपघाती मृत्यू शुक्रवारी झाला. दरम्यान, सदर अपघाती मृत्यूप्रकरणी मृत कामगार विनोद भोईटे याच्या कुटूंबाला योग्य ती भरपाई एल अँड टी कंपनीने देण्यासह भोईटे यांच्या मुलीला नोकरी कंपनीने द्यावी अशी मागणी भोईटे याच्या कुटूंबियांसह समाज समता कामगार संघातर्फे करण्यात आली आहे. मात्र सदर कंपनी व्यवस्थापन याबाबत लेखी देण्यास मनाई करत आहे. त्यामुळे जोपर्यंत भोईटे कुटुंबियांच्या मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यंत विनोद भोईटे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचा इशारा समाज समात संघटनेने कंपनीला दिला आहे.
एल अँड टी कंपनीत घडलेल्या दुर्घटनेत, मृत पावलेले विनोद विष्णू भोईटे हेे नवी मुंबई महानगरपालिकेत आरोग्य विभागात सानपाडा नागरी आरोग्य केंद्र येथे औषध फवारणी कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होते. तुटपुंज्या वेतनात कुटुंबाचा उदरनिर्वाह होत नाही. यासाठी नवी मुंबई महापालिकेचे काम संपल्यावर भोईटे हे खाजगी ठेकेदारामार्फत विविध ठिकाणी काम करत होते. शुक्रवार दि. 4 फेब्रुवारी 2022 रोजी 6 वाजता महापे येथील एल अँड टी कंपनीत औषध फवारणीचे काम करत असतांना लोखंडी अँगल डोक्यात पडून भोईटे हे जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना महापे येथून वाशी रुग्णालयात उपचारासाठी घेवून जात असताना त्यांचे निधन झाले आहे. दरम्यान, मृत कामगार विनोद भोईटे यांच्या मृत्यूप्रकरणी एल अँड टी कंपनी कडून भोईटे यांच्या कुटूंबाला योग्य ती नूकसान भरपाई मिळण्यासह त्यांच्या मुलीला नोकरी मिळावी अशी मागणी समाज समता कामगार संघासह मृत विनोद विष्णू भोईटे यांच्या कुटुंबियांची मागणी आहे. मात्र सदर मागणी बाबत एल अँड टी कंपनी व्यवस्थापन लेखी देण्यास मनाई करत आहे. त्यामुळे जोपर्यंत कंपनी व्यवस्थापन लेखी हमी देणार नाही तोपर्यंत मृत विनोद भोईटे यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही. रविवारपर्यंत याबाबत कंपनीने कुठलाच निर्णय घेतला नसल्याने तसेच सोमवारी दुपारी 12.00 वाजता मृत कामगार विनोद भोईटे यांचा मृतदेह महापे येथील एल अँड टी कंपनीच्या गेटवर नेवून आंदोलन करणार असल्याचा इशारा समाज समता संघटनेने दिला आहे.