स्वच्छ कामोठे - हरीत कामोठेचा नारा देत कामोठेकरांनी राबविली स्वच्छता मोहिम!

 


कामोठे (प्रतिनिधी) - कामोठे कॉलोनी फोरमतर्फे स्वच्छ कामोठे- हरीत कामोठे उपक्रमाअंतर्गत स्वच्छतेचा नारा देत, कामोठ्यातील नागरिकांनी स्वच्छता मोहिम राबविली. या मोेहिमेअंतर्गत नागरिकांकडून कामोठे हायवे ब्रिज ते पोलीस स्टेशन चौक रस्त्यामध्ये असलेल्या दुभाजकावरील कचरा साफ करण्यात आला. यावेळी झाडे जगवण्यासाठी झाडांच्या आजुबाजुला असलेले गवत अणि कचरा साफ करण्यात आला. अनेक ठिकाणी नारळाच्या झावळ्या ह्या वायरला लटकलेल्या दिसल्या, ह्या झावळयांमुळे रस्त्याने जात असलेल्या दुचाकीस्वारास अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशा अनेक फांद्या अणि झावळ्या दुभाजकावरुन काढून टाकण्यात आल्या. तसेच अनेक ठिकाणी निर्माल्य दुभाजकावर फेकून दिल्याचे निर्दशनास आले. ह्यावेळी स्वच्छ कामोठे हरीत कामोठेचा संदेश देणारे फलक दाखविण्यात आले. तसेच शुभ शगून सोसायटी समोरील मोबाईल टॉवर उभारणीच्या कामामुळे तयार झालेले डेब्रिज दुभाजकांवरच टाकण्यात आलेले होते. कामोठे कॉलोनी फोरमच्या समन्वयकांनी शहर सुशोभिकरणाची मोहीम हाती घेतली असुन यामध्ये पालिका अणि सिडको प्रशासनाचे सहकार्य अपेक्षीत आहे. पुढील 7 दिवसांत कामोठे शहरातील दुभाजक जर स्वच्छ नाही करण्यात आले तर दुभाजकांवरील कचरा सिडको कार्यालयात नेऊन टाकण्यात येईल असा इशारा कॉलोनी फोरमच्यावतीने देण्यात आला. यावेळी बोलतांना फोरमचे अध्यक्ष मंगेश अढाव यांनी स्वच्छतेचे महत्व विशद केले.

या स्वच्छता मोहिमेमध्ये कामोठे  कॉलोनी फोरमचे अध्यक्ष मंगेश अढाव, महिला अध्यक्ष जयश्री झा, फोरमचे समन्वयक बापू साळुंखे, समाधान काशिद, डॉ. गारळे, राहुल आग्रे, महेंद्र जाधव, अरुण जाधव, रवी पाढी, हिरा भट, सागर अलदर , संभाजी पवार, अमित घुटूकडे, अरूणा सावंत, शुभांगी खरात, निवेदिता बारापात्रे, सुधा सिंग, मनिषा नीलकंठ आदी सहभागी झाले होते.