बेशिस्त पार्किंगमुळे शहरातील फुटपाथसह रस्ते गायब... ऐरोलीत चारचाकी वाहनपार्किंगमुळे फुटपाथ गिळकृंत

 


नवी मुंबई (प्रतिनिधी) - महाराष्ट्र महापालिका अधिनियमामधील कलम 230 अन्वये महापालिका आयुक्तांची लेखी परवानगी घेतल्याशिवाय महापालिका क्षेत्रातील रस्त्यावर वा पदपथावर कोणतीही वस्तू ठेवण्यास मनाई आहे. परंतु, शहरातील सर्वच नोडमध्ये मुख्य रहदारीचे रस्ते व अंतर्गत रस्ते यावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात बंद वाहने असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच, बंद अवस्थेत असलेल्या शहर स्वच्छतेला खीळ बसते आहे. दरम्यान, सन 2016पासून ते आजतागायत 2126 वाहने महापालिकेकडून उचलण्याची कारवाई करून सदरची वाहने ही महापालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडवर जमा करण्यासह या वाहनांची सूची महापालिकेच्या वेबसाईटवर प्रसिध्द केली आहे. मात्र आजही शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यांवर तसेच फुटपाथवरही वाहन पार्किंगचे प्रकार होत असल्याने फुटपाथसह रस्ते गायब झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे. या प्रकारामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शहरातील वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी रस्त्याकडेला पार्क केलेली वाहने आणि बेवारस वाहनांवर पोलिसांसह महानगरपालिकेने कारवाई केली होती. या कारवाईनंतरही शहरात बेशिस्त पार्किंगचा प्रश्न कायम आहे. रस्त्याकडेला पार्क केलेल्या वाहनांमु्ळे वाहतूक कोंडीसह अपघातांचा धोकाही वाढला आहे. अनेक वाहन दुरुस्ती करणारे रस्त्यावर वाहने उभी करून दुरुस्तीसह अनेक कामे करत असतात. शहरात वाहनांची संख्या प्रचंड वाढत आहे. शहरातील अरुंद रस्ते आणि पार्किंगसाठी जागेचा अभाव असल्याने अनेक वाहने रस्त्याकडेलाच पार्क केली जातात. कोपरखैरणे तीन टाकी परिसरापासून डी मार्टला जोडणार्‍या रस्त्यापर्यंत वाहन पार्किगंची समस्या गंभीर आहे. या मार्गावर दुतर्फा वाहन पार्क़िगमुळे सर्वांनाच त्रास सहन करावा लागतो. 

आजमितीस नवी मुंबईत बहुतांश ठिकाणी वाहने रस्त्याकडेलाच पार्क केली जातात. इमारतींचे बांधकाम करताना पार्किंगसाठी जागा दाखवली जाते. मात्र या जागेत नंतर दुकानगाळे थाटले जातात. या वृत्तीमुळे सर्रास वाहने रस्त्यावरच पार्क केली जातात. नंतर या दुकानांचे अतिक्रमण फुटपाथवरून रस्त्यांवर येते.ऐरोली से- 8 या परिसरातील एका सोसायटीच्या समोरील फुटपाथवर सर्रासपणे चारचाकी वाहन पार्किंग करून नागरिकांसाठी असलेला फुटपाथ गिळकृंत करण्याचा प्रकार  केला जात आहे. या प्रकारामुळे शाळेत ये - जा करणार्‍या विद्यार्थ्यांना नाईलाजास्तव रस्त्यावरून यावे लागत असल्याने अपघाती घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे फुटपाथवर वाहन पार्क करून नियम तोडणार्‍यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. 

नवी मुंबई शहरातील काही मोजकी रुग्णालये वगळल्यास बहुतांश रुग्णालयांचे स्वत:चे पार्किंग नाही. रुग्णालयात येणारे रुग्ण, नातेवाईक यासह रुग्णवाहिकाही रस्त्याकडेला उभ्या असतात. खासगी क्लासेस, हॉटेल्स गॅरेजमध्ये येणारी वाहने रस्त्याकडेला पार्क केली जातात.एकंदरीत शहरातील या बेशिस्त वाहन पार्किंगमुळे फुटपाथसह रस्ते गायब होत असल्याने त्याचा सर्वसामान्य करदात्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याने संबंधित यंत्रणांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.