नवी मुंबईकरांसाठी खुशखबर... नवी मुंबई ते मुबंई वॉटर टॅक्सी सेवा लवकरच होणार सुरु

 

मुंबई - मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. लवकरच मुंबई ते नवी मुंबई दरम्यान वॉटर टॅक्सी सेवा सुरू होणार आहे. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल हे या सेवेचे उद्घाटन करणार असून या वॉटर टॅक्सी सेवेमुळे मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे.

गेल्या तीस वर्षांपासून मुंबई नवी मुंबई दरम्यान जलसेवा असावी असा प्रस्ताव होता. गेल्या काही वर्षात केंद्र सरकारने जलमार्ग प्रकल्पातून या प्रस्तावाला वेग मिळाला. हा प्रकल्प केंद्रीय संस्था मुंबई पोर्ट ट्रस्ट आणि राज्य सरकारच्या महाराष्ट्र सागरी मंडळ आणि सिडकोच्या संयुक्त विद्यमाने सुरू होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या वॉटर टॅक्सीसाठी तीन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. एक मार्ग दक्षिण मुंबईतील माझगावच्या डोमेस्टिक क्रुझ टर्मिनल ते बेलापूरपर्यंत असणार आहे. दुसरा मार्ग नवी मुंबईच्या बेलापूर ते एलिफंटा लेणी तर तिसरा मार्ग बेलापूर ते जेएनपीटी पर्यंत असणार आहे. ही वॉटर टॅक्सी सेवा नंतर मांडवा, रेवस आणि कारंजापर्यंत वाढवण्यात येणार आहे. तसेच बेलापूर जेट्टीचे सध्या काम सुरू असून वॉटर टॅक्सी या जेट्टीपर्यंतही धावणार आहे.

जलवाहतूकीसाठी चार खासगी कंपन्यांना कंत्राट देण्यात आले आहे. तसेच स्पीड बोट आणि मोठ्या बोटीतून ही जलवाहतूक होणार आहे. माझगाव ते बेलापूर या मार्गावरील मोठ्या बोटीचे भाडे हे 290 रुपये इतके असणार आहे. तर महिन्याचा पास 12 हजार रुपयांना मिळणार आहे. अवघ्या 40 ते 50 मिनिटांत हा प्रवास पूर्ण होणार आहे. तसेच बेलापूर एलिफंटा केव्ह दरम्यान रीटर्न भाडे हे 825 रुपये इतके असणार आहे. माझगाव ते बेलापूर दरम्यान स्पीड बोटचे भाडे 800 ते 1200 रुपयांना असणार आहे. हा प्रवास अवघ्या 25 ते 30 मिनिटांत पूर्ण होईल. मुंबई ते नवी मुंबईला जायला दीड तास वेळ लागतो. जलवाहतुकीमुळे हा वेळ निम्य्यावर येऊन अवघ्या 45 मिनिटात मुंबईहून नवी मुंबई गाठता येणार आहे. 17 फेब्रुवारपासून ही वॉटर टॅक्सी सेवा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे.