कामोठे (वार्ताहर) - कामोठे वसाहतीमधील एका भोजनालयात असलेल्या सिलेंडरचे स्फोट होवून लागलेल्या आगीत भोजनालयासह बाजूला असलेल्या दोन घरांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत,कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे सांगण्यात येते.
कामोठे वसाहतीमधील से-11 येथील स्वस्तिक प्लाझा या इमारतीमध्ये जयंतीलाल यांचे भवानी भोजनालय आहे. सदर ठिकाणी काल सायंकाळी 7 वाजण्याच्या दरम्यान सिलेंडरचे स्फोट होवून आग लागली. या आगीची झळ बाजूच्या घरांना सुद्धा आग लागून त्यांचे मोठे नुकसान झाले. स्फोटाच्या आवाजामुळे आजूबाजूचे सर्व रहिवाशी घराबाहेर पडल्यामुळे कुठलीही जिवीतहानी झाली नाही. साधारण 4 सिलेंडरचे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच कामोठे पोलीस ठाण्याचे पथक तसेच पनवेल व कळंबोली अग्नीशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल होवून त्यांनी उपाय योजना करत अवघ्या 15 ते 20 मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविले. सायंकाळची वेळ असल्याने मोठ्या प्रमाणात या भागात रहदारी असते. त्यामुळे आग पसरली असती तर मोठी जिवीतहानी झाली असती अशी भीती याबाबत बोलतांना येथील रहिवाशांनी यासंदर्भात बोलतांना व्यक्त केली. दरम्यान, कामोठे वसाहतीमधील लोकसंख्या वाढण्यासह आगीच्या घटनांतही वाढ झाली झाली असल्यामुळे पनवेल महानगरपालिकेने व सिडकोने आरक्षित करून ठेवलेल्या भूखंडावर अग्नीशमन केंद्र उभारावे अशी मागणी भाजपचे कामोठे शहराध्यक्ष रवींद्र जोशी, यांनी याबाबत बोलतांना केली आहे.