पनवेल (प्रतिनिधी) - राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात बदल करण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. सार्वजनिक विद्यापीठ कायद्यात राज्य शासनाने केलेले हे बदल मागे घ्यावेत या मागणीचे निवेदन काल अभाविपचे प्रदेश सहमंत्री योगेश्वर पुरोहित यांच्या मागर्र्दर्शनाखालील शिष्टमंडळाने पनवेल तहसिलदारांना सादर करण्यात आले.
दरम्यान, या निर्णयावर कोणतीही चर्चा होऊ न देता लोकशाही पायदळी तुडवून गोंधळाच्या वातावरणात शिक्षणाच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम करणारे बदल करून विद्यापीठ कायदा असंविधानिक पद्धतीने पारित केला. बदल केलेल्या विद्यापीठ कायद्यामुळे शिक्षण क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप वाढून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढणार आहे. विद्यापीठांच्या स्वायतत्तेवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न राज्यशासन करीत आहे. विद्यापीठ कायद्यात करण्यात आलेले बदल मागे घेण्यात यावे, यासाठी अभाविप राज्यभर अनेक आंदोलने करत आहे. दरम्यान, सरकारने हे बदल मागे न घेतल्यास विद्यापीठांची स्वायत्तता अबाधित ठेवण्यासाठी अभाविप आणखी तीव्र आंदोलन करेल असा इशारा प्रदेश सहमंत्री योगेश्वर पुरोहित यांनी यावेळी माहिती देतांना दिला.