सिडकोच्या घरकुल योजनेत माथाडी कामगारांना मिळणार घरे!

 


नवी मुंबई (प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री यांनी दिलेल्या सुचनेनुसार व माजी मंत्री व आ. शशिकांत शिंदे यांच्या मागणीनुसार  काल सिडको भवन येथे माथाडी कामगारांना घरे उपलब्ध करुन देण्याबाबतची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये वाशी ट्रक टर्मिनल, जुईनगर, कळंबोली, मानसरोवर, उलवा, तळोजा व इतर सिडकोच्या विविध ठिकाणच्या असलेल्या घरकुल योजनेमध्ये माथाडी कामगारांना प्राधान्याने घरे उपलब्ध करुन देण्याचा पाथमिक निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आ. शशिकांत शिंदे यांनी दिली आहे.

सदर बैठकीसाठी सिडकोचे सह.व्यवस्थापकीय संचालक मुदगल, तसेच सिडकोचे वरिष्ठ अधिकारी फैय्याज शेख, माथाडी संघटनेचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप,संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, माथाडी मंडळाचे ग्रोसरी बोर्डाचे चेअरमन वाघ, ट्रान्सपोर्ट बोर्डाचे चेअरमन खरात, रेल्वे बोर्डाचे चेअरमन दाभाडे, आयर्न बोर्डाचे चेअरमन व्हनगळकर, भाजीपाला बोर्डाचे सेक्रेटरी खोत आदी उपस्थितीत होते. 

माथाडी कामगार हा पामुख्याने नवी मुंबई परिसरात मोठ्या पमाणात  कुंटूंबासमवेत राहत असल्याने त्यांना सिडकोच्या माध्यमातुन राबविल्या जाणार्‍या घरकुल योजनेतुन घरांचा लाभ मिळावा, यासाठी माजी मंत्री व आ. शशिकांत शिंदे यांनी गेल्या 6 महिन्यापासुन सिडकोकडे सतत मागणी व पाठपुरावा केला होता. त्यांच्या या मागणीनुसार सिडको कार्यालयात अनेक वेळा बैठका घेण्यात आल्या होत्या. याच विषयावर काल दि.08 फेब्रुवारी,2022 रोजी झालेल्या बैठकीमध्ये उपरोक्त नमुद नवीमुंबई परिसरात माथाडी कामगारांकरीता  सिडकोच्या माध्यमातुन राबविल्या जाणार्‍या घरकुल योजनेतुन सुमारे 40 ते 45 हजार घरे उपलब्ध होणार आहेत. यानुसार ही संपुर्ण घरे माथाडी कामगारांच्या मागणीनुसार शासनाच्या माथाडी मंडळांमार्फत या घरांचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार माथाडी कामगारांनी बोर्डाच्या माध्यमातुन घरांसाठी मागणी करण्याचा निर्णयही घेण्यात आलेला आहे, याबाबत असणारी संपुर्ण प्रक्रिया पुढील 8 ते 10 दिवसात पुर्ण होईल व त्यानंतर कामगारांना त्यांच्या मागणीनुसार टप्प्या-टप्प्याने शासनाच्या बोर्डाच्या माध्यमातुनच घराचे वाटप करण्याचे तसेच या प्रक्रियेमध्ये जादा पमाणात अर्ज उपलब्ध  झाल्यास या घरांचे वाटप लॉटरी पध्दतीने करण्याचे ठरलेले आहे.  तसेच या बैठकीमध्ये माथाडी कामगारांना घरांसाठी लागणारे कर्ज व इतर नियोजन देखील करण्यात आलेले आहे. सदरील ही संपुर्ण पक्रिया कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या येत्या 23 मार्च,2022 रोजी होणार्‍या पुण्यतिथीच्या अगोदर करण्याचा मानस असल्याचा आ.शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे.