नवी मुंबई (प्रतिनिधी) - माघी गणेश जयंतीनिमित्त नवी मुंबईसह पनवेलमधील गणेश मंदिरे भाविकांनी गजबजली असल्याचे चित्र काल पाहायला मिळाले. कोरोनाचे संकट काही अंशी दुर झाल्याने हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या उरण तालुक्यातील चिरनेर गावातील श्री महागणपती चरणी नतमस्तक होण्याचा योग भाविकांसाठी शुक्रवारी आलेल्या श्री गणेश जयंती निमित्ताने जुळून आला.त्यामुळे श्री महागणपती चिरनेर चरणी नतमस्तक होण्यासाठी नवीमुंबई,ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल,पेण व उरण येथील अनेक भक्तांनी आप आपल्या कुटुंबासह मंदिरात श्रीच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळत होते.
नवसाला पावणारा गणपती म्हणून चिरनेर गावातील महागणपतीची ख्याती सर्वदूर पसरली आहे. माघी गणेशजयंतीनिमित्त मंदिरात आयोजित केलेल्या भजन, किर्तन आदी धार्मिक कार्यक्रमामुळे भक्तगन भावनिक वातावरणात तल्लीन झाले होते. येणार्या भाविकांना देवस्थानच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करावे अशा प्रकारच्या सूचना देवस्थानच्या कमिटी कडून भाविकांना देण्यात येत होते.
माघी गणेशजयंतीनिमित्त नवी मुंबईतील गणेश मंदिर परिसरात फुलांची विशेष आरास करण्यात आली असल्याचे दिसून येते होते. ऐरोलीतील इच्छापूर्ती गणेश मंदिर, ऐरोली से-4 मधील वरदविनायक मंदिर, से-5 मधील सिध्दिविनायक मंदिर आदी विविध मंदिरांमध्ये भाविकांनी गणरायाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. यानिमित्त या मंदिरांमध्ये कोरोना नियमांचे पालन करून धार्मिक कार्यक्रमही पार पडले. तर पनवेल तालुक्यातील कोपर गावात स्वयंभू चिंतामणीचे पुरातन मंदिर असून याठिकाणी जवळपास शंभर वर्षांची माघी गणेशजयंतीची परंपरा आहे. याठिकाणी भजन, कीर्तन, हरिनाम सप्ताह, महाप्रसाद, पालखी सोहळा यासारख्या विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळत आहे.शुक्रवारी सकाळपासूनच भाविकांनी बाप्पाच्या दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. यावेळी कोपर गावचे माजी पोलीस पाटील नाथा पाटील, गावचे प्रतिष्ठित नागरिक चंद्रकांत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव सुरेश धुमाळ, ग्रामस्थ पंच कमिटी मंदिर कमिटीचे दयाळ पवार यांच्यासह आदी पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. माघी गणेशजयंतीनिमित्त या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.