नवी मुंबई (प्रतिनिधी) - स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये 10 ते 40 लाख लोकसंख्येच्या देशातील मोठ्या शहरांमध्ये सर्वप्रथम क्रमांकाच्या शहराचा बहुमान लाभण्याप्रमाणेच ओडीएफ कॅटेगरीमध्ये नवी मुंबईला वॉटरप्लस हे सर्वोच्च मानांकन मिळाले आहे. त्या अनुषंगाने शहर स्वच्छतेप्रमाणेच शौचालय स्वच्छता ही अत्यंत महत्वाची व जबाबदारीची गोष्ट असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारची हयगय खपवून घेतली जाणार नाही. याकामी कसूर दिसल्यास मोठ्या रक्कमेची दंडात्मक कारवाई करणे तसेच तरीही कामामध्ये सुधारणा न झाल्यास संस्थेला काळ्या यादीत टाकण्यापर्यंतची कारवाई होऊ शकते अशी स्पष्ट तंबी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी शौचालय सफाई कंत्राटदारांना देतांनाच शौचालय साफसफाईकडे काळजीपूर्वक लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत.
शौचालय व्यवस्थापन हा स्वच्छ सर्वेक्षणामधील एक महत्वाचा भाग असून नागरिकांमार्फत दररोज वापर केली जाणारी बाब आहे. त्यामुळे नागरिकांना स्वच्छ व सुविधाजनक शौचालये उपलब्ध करून देणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य असून याबाबत शौचालय व्यवस्थापन करणार्या कंत्राटदारांसमवेत आयुक्त अभिजीत बांगर यांनी थेट संवाद साधला. याप्रसंगी प्रशासन व परिमंडळ 1 चे उप आयुक्त श्री. दादासाहेब चाबुकस्वार व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे उपस्थित होते.