खारघर (प्रतिनिधी) - हळदी- कुंकवाच्या कार्यक्रमात सुवासिनींनाच मान देण्याची प्रथा आहे़ परंतु, खारघर येथील कॉलनी फोरमच्या संकल्पनेतून विधवा नव्हे ’स्त्री’ मी हा अनोखा उपक्रम राबवून हळदी- कुंकू कार्यक्रमास विधवा महिलांनाही मान देत नवा पायंडा पाडण्याबरोबरच समाजासमोर एक नवा आदर्श उभा केला आहे.
यावेळी कॉलनी फोरमच्या अध्यक्षा लीना गरड, समन्वयक अनिता भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पतीच्या निधनानंतर महिलेला कुंकू लावण्यास बंदी घालणं कितपत योग्य आहे. दु:खाचा डोंगर डोक्यावर कोसळलेला असतानाही शेती, उद्योगधंदे, घरं चालवणे, मुलांचं शिक्षण या सर्व जबाबदार्या महिला आपलं कर्तव्य समजून पार पाडतात. तरीही अशा महिलांना समाजात सापत्न वागणूक का? म्हणूनच आम्ही विधवा नव्हे ’स्त्री’ मी हा उपक्रम राबवला असल्याचे कॉलनी फोरमचे समनव्यक आणि क्रेडाई एमसीएचआयचे रायगड जिल्हा अध्यक्ष मधु पाटील यांनी सांगितले.दरम्यान, कुंकवाचा धनी परलोकवासी झाल्यानंतर घरीदारी उपेक्षेची नजर वाट्याला आलेल्या महिलांच्या कपाळी या कार्यक्रमात हळदी-कुंकवाची बोटं लागताच त्यांच्या डोळ्यात पाणी तरळले होते. वैधव्य आलेल्या 15 महिलांना यावेळी हळदी कुंकू लावत त्यांना विशेष भेट देत पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. खारघर से 21 च्या चतुर्भुज सोसायटी मधील कॉलनी फोरमच्या जनसंपर्क कार्यालया समोर मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला. यावेळी गानसम्राज्ञी लता मंगेशकर (दीदी) यांच्या निधनाबद्दल त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करत उपस्थितांकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.