विष प्यायलेल्या विवाहितेला घरातच ठेवल्याने मृत्यू

 


कोपरखैरणे (प्रतिनिधी) - सासरच्या त्रासाला कंटाळून विष प्यायलेल्या विवाहितेला उपचारासाठी देखील मदत न करता घरातच ठेवल्याची घटना समोर आली आहे. अखेर दोन दिवसांनी विवाहितेनेच आपण विष प्यायल्याने माहेरच्यांना कळविल्यानंतर त्यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत संपूर्ण अंगात विष पसरल्याने उपचारादरम्यान 15 दिवसांनी तिचा मृत्यू झाला.

कोपरखैरणे सेक्टर 12 डी येथे राहणार्‍या कुटुंबात हा प्रकार घडला आहे. मानसी भगत (36) असे मृत पावलेल्या विवाहितेचे नाव असून ती मूळची बुलढाणा येथील गवई कुटुंबातील आहे. आठ महिन्यांपूर्वी तिचा विवाह कोपरखैरणे येथे राहणार्‍या अजय योगीराज भगत याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर मानसी ही कोपरखैरणेत पती व सासू कमलाबाई यांच्यासह राहायला होती. मात्र, लग्नाच्या एक महिन्यानंतरच तिला पती व सासूकडून त्रास देण्यास सुरुवात झाली होती. याबाबत ती माहेरच्यांकडे सतत तक्रार करत होती. त्यावरून तिच्या माहेरच्यांनी मानसी हिच्या सासरी येऊन त्यांची समजूत देखील काढली होती. त्यानंतरही छोट्या-छोट्या गोष्टींवरून पती व सासूकडून होणार्‍या त्रासाला मानसी कंटाळली होती. या त्रासातून सुटकेसाठी तिने 14 जानेवारीला उंदीर मारण्याचे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे तिला त्रास होऊ लागला असतानाही पती व सासूने तिला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन न जाता तिच्याकडे दुर्लक्ष केले. अखेर विषारी औषध शरीरात पसरू लागले असता मानसीचा त्रासदेखील वाढू लागला.