मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमणार!

 


मुंबई - मुंबई महापालिका निवडणुकीची लवकरच घोषणा होणार आहे. त्यादृष्टीने आता महाविकास आघाडी सरकारने पाऊल उचलले आहे. मुंबई महापालिकेवर प्रशासक नेमणार, असल्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे.

त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीबाबत चर्चा झाली. बृहन्मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी मुंबई महापालिका अधिनियमात सुधारणा करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

बृहन्मुंबई महापालिकेची मुदत 7 मार्च 2022 रोजी संपत आहे. परंतू, राज्यात कोविडची आपत्ती त्याचप्रमाणे बृहन्मुंबई महापालिकेच्या सदस्य संख्येत केलेली वाढ आणि त्यामुळे झालेली प्रभागांची पुनर्रचना यामुळे ही निवडणूक घेणे शक्य होणार नसल्याने प्रशासक नियुक्ती करण्याची सूचना राज्य निवडणूक आयोगाने केली होती. सद्यस्थितीत प्रशासक नियुक्तीबाबत मुंबई महापालिका अधिनियम 1988 मध्ये कोणतीही तरतूद नाही, त्यामुळे ही सुधारणा करण्यासाठी अध्यादेश प्रख्यापित करण्यात येईल. प्रशासकाची नियुक्ती ही आगामी सार्वत्रिक निवडणुकीनंतर होणार्‍या महापालिकेच्या पहिल्या सभेच्या दिनांकापर्यंत लागू राहणार आहे.