पनवेल (प्रतिनिधी) - कॅन्सर या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या महिलांना व मुलामुलींना अर्थसहाय्य मिळण्याचा विषय काल झालेल्या महिला बालकल्याण समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. महिला व बालकल्याण समितीची बैठक काल सभापती हर्षदा उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त दालनाशेजारील सभागृहात ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली.यावेळी सहाय्यक आयुक्त वंदना गुळवे, सचिव तिलकराज खापर्डे व इतर सदस्य ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते.
बदलत्या जीवनशैली व प्रदुषणामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढत असून त्यावरील उपचाराकरिता होणारा खर्चही मोठा असतो. पनवेल महापालिका क्षेत्रातील अशा गरजू लोकांना रूग्णाच्या औषधोपचाराकरिता मदत म्हणून अर्थसहाय्य दिल्यास त्यांना आर्थिक संकटातून बाहेर येण्यास मदत होईल. या हेतूने हा विषय बैठकीत मांडण्यात आला. या विषयास सर्व सदस्यांनी मंजूरी दिली. महापालिका आयुक्त गणेश देशमुख आणि अतिरीक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाहीसाठी हा विषय महासभेत मांडण्यात येणार आहे. याबरोबरच आठ मार्च रोजी साजरा होणार्या जागतिक महिला दिनाच्या नियोजनाबद्दल यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच सभापतींनी दिलेल्या इतर विषयांच्या प्रस्तावावर, सदस्यांनी मांडलेल्या विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली.