माथाडी कामगारांचा संप मागे!

 

वाशी (प्रतिनिधी) - 50 किलोपेक्षा अतिरिक्त वजनाच्या गोणी उचलण्यास नकार देवून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी माथाडी कामगारांनी अचानक बंद पुकारला होता. या संपामुळे एपीएमसी बाजारपेठेबाहेर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मात्र सायंकाळी काही शेतकरी संघटनांनी पुढाकार घेवून माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्याशी चर्चा करून संप मागे घेण्याची विनंती केली. त्यानुसार माथाडी कामगारांनी सायंकाळी आपला संप मागे घेतला. त्यामुळे सायंकाळी साडेपाच नंतर मार्केट पुन्हा सुरु होवून शेतकर्‍यांच्या गाड्याही खाली करण्यात आल्याची माहिती शेतकरी प्रतिनिधी सचिन महाडिक यांनी दिली. 50 किलोपेक्षा अतिरिक्त वजनाची हाताळणी न करण्याच्या मागणीवरून काल मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील माथाडी कामगारांनी आक्रमक होत बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात ठिय्या आंदोलन करत निदर्शने केली. या ठिय्या आंदोलनास माथाडी नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्यासमवेत संघटनेचे संयुक्त सरचिटणीस व माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील व रविकांत पाटील तसेच संघटनेचे इतर पदाधिकार व शेकडो माथाडी कामगार उपस्थित होते.  या आंदोलनामुळे कांदा बटाटा मार्केटमध्ये विविध ठिकाणाहून माल घेवून आलेल्या शेतकर्‍यांच्या गाड्या बाजार आवारात उभ्या होत्या. दरम्यान, या संपामुळे शेतकर्‍यांचे होत असलेले नूकसान पाहून यातून चांगला निर्णय निघावा या हेतुने शेतकरी संघटनेतील काही पदाधिकार्‍यांनी सुरुवातीला बाजार समिती सचिव देशमुख यांची भेट घेवून त्यांच्याशी व त्यानंतर व्यापार्‍यांशीही चर्चा करण्यात आली. मात्र बाजार समिती व व्यापारी घटकांकडून शेतकर्‍यांचे समाधान न झाल्यामुळे अखेरीस शेतकर्‍यांनी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्याशी याबाबत चर्चा करून त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. तसेच यावेळी  50 किलो पेक्षा जास्त वजनाच्या गोण्या मागवणार्‍या व्यापार्‍यांविरोधात नोटीस काढण्यासंदर्भात बाजार समितीने निर्णय घेतल्यामुळे अखेरीस माथाडी कामगारांनी आपला संप मागे घेत, बाजार समितीत विविध ठिकाणाहून शेतकर्‍यांच्या आलेला माल खाली करण्यास सुरुवात केली. संप मागे घेण्यात आल्यामुळे मार्केट सुरु होवून मालाची विक्रीही झाली असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, यापुढे जर मार्केट बंद करण्याचा निर्णय घ्यायचा असेल तर त्याबाबतची पूर्ण कल्पना देण्यात येईल असा निर्णयही घेण्यात आल्यामुळे शेतकर्‍यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.