नवी मुंबई (प्रतिनिधी) - नवी मुुंबई महापालिका निवडणूकीचे पडघम वाजू लागले असतांनाच प्रत्यक्ष निवडणूक रणांगणात होणारी राजकीय अस्तित्वाची लढाई आता निवडणूकीपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात रंगणार आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली पाठोपाठ नवी मुंबईतही प्रभाग रचनेच्या आराखड्यावर भारतीय जनता पक्षाने गंभीर आरोप करत याबाबत न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा दिला आहे. या न्यायालयीन लढाईचे आव्हान आ. गणेश नाईक यांच्याकडून मिळताच शिवसेनेने तात्काळ मुंंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. शिवसेनेचे शहरप्रमुख किेशोर पाटकर यांनी या न्यायालयीन लढाईत पुढाकार घेतला असून शिवसेनेतर्फे कॅव्हेट दाखल केले आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या आजवरच्या झालेल्या पाचही निवडणूकांमध्ये आ. गणेश नाईक यांनी पालिकेवर एकहाती वर्चस्व प्राप्त केले आहे. यामध्ये पहिल्या निवडणूकीत गणेश नाईकांच्या नेतृत्वात महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला होता. तर त्यानंतर लागोपाठच्या निवडणूकांमध्ये गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसलाच सत्ता मिळाली होती. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी यापूर्वी नवी मुंबई महापालिकेतील सत्तेचं नेतृत्व सांभाळणारे गणेश नाईक, महापालिकेच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणूकीच्या वेळी मात्र भारतीय जनता पक्षातर्फे रणांगणात उतरले आहेत. गेल्या विधानसभा निवडणूकीच्या वेळी राष्ट्रवादी काँंग्रेस पक्षातील बहूतांश नगरसेवकांना सोबत घेवून गणेश नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश करीत नवी मुंबई भाजपमय केली होती. यानंतर नवी मुंबईतून गणेश नाईक व मंदा म्हात्रे हे दोन आमदार भाजपतर्फे निवडून आले होते.
आजमितीस नवी मुंबईत भाजपकडे दोन आमदार असले तरी त्यांच्यातील राजकीय मतभेद सर्वांनाच माहित आहेत. गणेश नाईकांना कोंडीत पकडण्याची एकही संधी आ.मंदा म्हात्रे कधी सोडत नाही. तर दुसरीकडे भाजप नेतृत्वासमोर मात्र दोन्ही आमदारांची एकजूट दाखविली जाते. आगामी महापालिका निवडणूकांमध्ये दोन्ही आमदार एकजुटीने लढण्याचा व जिंकून येण्याचा विश्वास दाखवत असले तरी प्रत्यक्षात तसे चित्र कधी आढळून येत नाही. नवी मुंबई भाजपमधील याच परिस्थितीचा फायदा घेत यावेळी राज्यातील ठाकरे सरकार नवी मुंबईवर सत्तेचं स्वप्न बघू लागले आहे. शिवसेना नेते व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. राजन विचारे, उपनेते विजय नाहटा, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले या चारही नेत्यांनी सध्या नवी मुंबईवर शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा चंग बांधला आहे. या नेत्यांमध्येही राजकीय मतभेद असले तरी गेल्या काही वर्षात उघडपणे आपसातील मतभेद चव्हाट्यावर येणार नाहीत याची काळजी शिवसेना पक्षाने घेतली आहे.
आ.मंदा म्हात्रे एकीकडे मुख्यमंत्री, पालकमंत्री, सिडको प्रशासन, आयुक्त यांचे कौतूक करतात. तर नाव न घेता कधी गणेश नाईकांवर तर कधी त्यांच्या महापालिकेतील सत्ता काळात मनमानी झाल्याचा आरोप करतांना दिसतात. यासर्व परिस्थितीचा फायदा उचलण्याच्या तयारीत असलेल्या शिवसेनेेने नवी मुंबईतील प्रभाग रचनेत मात्र बाजी मारली आहे. शिवसेनेच्या बहूतांश ज्येष्ठ नगरसेवकांना या प्रभाग रचनेचा फायदाच झाला आहे. तर भाजपच्या अनेक ज्येष्ठ नगरसेवकांच्या प्रभागाची मोडतोड करण्यात आली आहे.