पनवेल (वार्ताहर) - कोविड-19 महामारीमुळे तिसर्या लाटेचा प्रादुर्भाव थोपविण्यासाठी बंद ठेवण्यात आलेले कर्नाळा अभयारण्य नुकतेच पर्यटकांसाठी खुले करण्यात आल्याने निसर्गप्रेमी पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
कोरोनाचा तिसर्या लाटेचा संभाव्य धोका टाळण्यासाठी जानेवारी महिन्यात शासनाच्या निर्देशानुसार हे अभयारण्य बंद ठेवण्यात आले होते.या निर्णयामुळे पर्यटकांची मोठी हिरमोड झाली होती. एकीकडे मॉल्स,शॉपिंग कॉम्प्लेक्स सुरु असतांना निसर्गाच्या सानिध्यात वसलेले कर्नाळा अभयारण्य बंद ठेवल्याने निसर्गप्रेमी पर्यटकांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली होती. गुरुवारी अभयारण्य सुरु झाल्याने पहिल्याच दिवशी शेकडो पर्यटकांनी अभयारण्यात हजेरी लावली असल्याचे चित्र दिसत होते. शासनाने घालुन दिलेले कोविडचे नियम पाळुन पर्यटकांना प्रवेश दिला जात असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नारायण राठोड यांनी यासंदर्भात बोलतांना दिली.
कर्नाळा अभयारण्यात परिसरात पक्ष्यांच्या सुमारे 150 स्थानिक व सुमारे 37 स्थलांतरित प्रजाती आढळून येतात. अभयारण्यासह कर्नाळा किल्ला व तेथील सुळका हे देखील पर्यटकांचे आकर्षण राहिले आहे.कर्नाळा किल्ल्याचे शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात देखील एक वेगळी ओळख राहिली आहे. त्यामुळे या वास्तुला ऐतिहासिक महत्व असल्याने अनेक इतिहास संशोधक आवर्जुन याठिकाणी येत असतात.अशा सर्वानाच हे पर्यटन स्थळ सुरु होत असल्याने याठिकाणी मुक्त संचार करता येणार आहे.पर्यटकांना प्रवेश देताना आकारली जाणारी फी,पार्किंग फी आदींसह निवासस्थानाचे भाडे पर्यटकांकडून वसुल केले जाते.