पनवेल (वार्ताहर) - पनवेल न्यायालयासंबंधीच्या विविध धोरणात्मक बाबींवर चर्चा करून निर्णय घेण्याकामी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठकीची मागणी करणारे पत्र महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई यांना पनवेल वकील संघटनेतर्फे देण्यात आले आहे.
याप्रसंगी ना. सुभाष देसाई यांनी ठाकरे सरकार पनवेल न्यायालयातील धोरणात्मक बाबींवर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेईल ग्वाही पनवेलमधील वकील संघटनांच्या पदाधिकार्यांना दिली. पनवेल न्यायालयात न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर केला जातो याबाबत माहिती दिली असता, ना. सुभाष देसाई यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात न्यायालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर कसा वाढवता येईल याचा अभ्यास करून, त्यावर धोरणात्मक निर्णय घेणेकामी शासनाचे मराठी भाषा विभागाचे अधिकारी यांचा गट पनवेल न्यायालयात पाठवणार असल्याचे सांगत पनवेल वकील एकजुटीचे कौतुक केले आणि पक्षकार, वकील वर्ग व एकंदरच न्यायालयीन कामकाजाचा दर्जा असाच उंचावत ठेवून पनवेल न्यायालय हे महाराष्ट्रामध्ये एक आदर्श न्यायालय ठरावे अशा शुभेच्छा दिल्या. पनवेलमधील वकील अमर पटवर्धन यांच्या कार्यालयात ना. सुभाष देसाई यांनी भेट दिली असता, पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष मनोज भुजबळ यांनी ना. सुभाष देसाई यांच्यासमोर विविध बाबी मांडल्या.
