नेरुळ (वार्ताहर)- नेरुळ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका अदखलपात्र गुन्ह्यातील दोन गटांमध्ये पोलिस ठाणे परिसरात जुंपलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिला व पुरुष पोलिस अंमलदारांना शिविगाळीसह धक्काबुक्की करण्याचा प्रकार नुकताच घडला. याप्रकरणी सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी आयशा रफीक शेख, रेश्मा शेख, आयशा समीर शेख अशा तीन महिला व पुरुष रफिक शेख अशा एकूण चौघाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हकीकत अशी की, दारावेगावातील टुंपा दलाई नावाच्या महिलेने दि.4 फेबु्रवारी रोजी दारावेगावातीलच रफिक शेख, आयशा शेख, रेश्मा शेख, व आयशा समीर शेख या चार जणांविरोधात तक्रार दिली होती. त्याबाबत नेरुळ पोलीस ठाण्यात अदखलपात्र स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र यावेळी तक्रारदार महिलेबरोबर उपरोक्त चौघा जणांचे सायंकाळच्या सुमारास नेरुळ पोलिस ठाणे अंमलदार कक्षातच जोराचे भांडण जुंपले होते. यावेळी वायरलेस ऑपरेटर असलेल्या महिला अंमलदार अनिता पाटील यांच्यासह पीएसआय रविंद्र शिंदे, पोलिस हवालदार बनगर, परदेशी, आव्हाड, महिला पोलिस शिपाई बर्डे, इंगळे, शिंगटे, व भालेराव आदी पोलिसांनी मध्यस्थी करून सदरचे हे भांडण सोडविण्याचा प्रयत्न करून त्यांना सर्वांना पोलिस ठाण्याबाहेर जाण्यास सांगितले. त्यानुसार ते सर्वजण पोलीस ठाण्या बाहेर गेल्यानंतर काहीवेळाने त्यांच्या पुन्हा जुंपली. त्यामुळे सर्व महिला व पुरुष पोलीस अंमलदार रोडवर जावून भांडण सोडवू लागले. यावेळी पोलिस अंमलदार अनिता पाटील ह्या सरकारी गणवेशात असतांना, एका बुरखा घातलेल्या महिलेने आपल्या पायातील चप्पल हातात घेवून त्यांच्या दिशेने फेकून मारण्यासह शिवीगाळी करून त्यांना धक्काबुक्की केली. याप्रकरणी आयशा रफीक शेख, रेश्मा शेख, आयशा समीर शेख, व रफिक शेख,सर्व रा. दारावे से. नं. 23 नेरुळ यांच्याविरोधात भादंवि कलम 34, 353, 504 व 506 अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करत आहेत.